धुळे । थाळनेर शिवारातील गरताड परिसरात शेत मजुरीच्या पैशावरून झालेल्या वादातून चार जणांनी मिळून एकाची हत्या केल्याची घटना घडली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत हत्येचा उलगडा केला असून या प्रकरणात चार जणांना ताब्यात घेतले आहे.
धुळे जिल्ह्यातील थाळनेर शिवारातील गरताड परिसरात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. मात्र मृत इसमाची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. तसेच खुनाचे कारण शोधणे देखील आव्हान होते. परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील पोलिसांनी आपली तपासाची चक्र फिरवत या इसमाच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दरम्यान पोलिसांनी तपास केला असता शेती मजुरीतील वादावरून ही हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. मजुरी करणाऱ्या विधी संघर्षित बालकासोबत संबंधित मृत इसमाचे भांडण झाले होते. याच भांडणाच्या कारणातून विधी संघर्षित बालकाने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने संबंधित इसमाचा गळा आवळून खून केल्याची बाब पोलीस तपासात उघडकी झाली आहे.
अखेर पोलिसांनी सखोल तपास करत चारही मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यातील तिघा मारेकऱ्यांना थाळनेर येथुन ताब्यात घेण्यात आले आहे. तर एका मारेकऱ्यास पोलिसांनी मध्य प्रदेश येथून त्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.















Discussion about this post