मुंबई । उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिने ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे. मात्र, एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंसोबतच्या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले. या भेटीवर शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
पत्रकारांनी एकनाथ शिंदे-राज ठाकरे यांच्या भेटीबद्दल विचारले असता राऊत म्हणाले, ‘आमरसपुरी खायला गेला असेल चाट्या आहे तो. काल अमरासपुरीचा बेत होता ना. मी खोटं बोलत नाही. काल एकनाथ शिंदेंचा उपवासाचा दिवस होता.’
महापालिका निवडणुकीच्या दृष्टिने ही ठाकरे-शिंदे भेट महत्त्वाची मानली जात असताना संजय राऊत म्हणाले, त्यांच्या युतीबाबत देवेंद्र फडणवीस काय ते ठरवतील. अमित शाह हे एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळेच ते आल्यानंतर शिंदे त्यांना भेटायला जात असतात. तसेच राज ठाकरेंच्या पक्षाविषयी आपण सांगू शकत नाही पण त्यांची ध्येय धोरणंही दिल्लीतून ठरवली जात असल्याचे राऊत म्हणाले.महाराष्ट्रातील तीन पक्षांचे प्रमुख अमित शाह आहेत. त्यामध्ये शिंदेंची शिवसेना, भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा समावेश आहे. हे तीन पक्ष अमित शाह चालवतात, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
आम्ही जनतेला सोबत घेऊ…
कुठल्याही निवडणुका नसताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिबिर हे नाशिकमध्ये आज होत आहे.राज्याची जनता अस्वस्थ आहे. जनतेला बरोबर घेऊन आम्हाला काय करता येईल, याचा विचार आम्ही करतो आहोत.
पक्ष बांधणी, संघटना बांधणी, जनतेला सोबत घेऊन काम करणे यासाठी आजचे शिबिरी महत्त्वाचे असल्याचे राऊत म्हणाले. या शिबिरावरून लक्ष विचलित करण्यासाठी दर्ग्यांवर कारवाई केली जात असल्याचा आरोपही राऊत यांनी केला.
Discussion about this post