जळगाव l पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील तलाठी महेशकुमार भाईदास सोनावणे (वय ५०) यांना ६,००० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. त्यांनी तक्रारदाराच्या शेतीतील N.A. झालेल्या ९ प्लॉट्सवर नोंदी लावून देण्यासाठी १०,१७० रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ही रक्कम ६,००० रुपये करण्यात आली.
तक्रारदाराने या प्रकरणाची तक्रार नाशिक परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रारीच्या पडताळणीनंतर २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सापळा रचण्यात आला. पंचासमक्ष तलाठ्याने ६,००० रुपयांची लाच स्वीकारताच त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
या प्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक श्री योगेश ठाकूर यांच्या पर्यवेक्षणात करण्यात आली. सापळा अधिकारी आणि तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता नवघरे यांनी जबाबदारी पार पाडली.
सापळा पथकात पोलीस हेडकॉन्स्टेबल किशोर महाजन, पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाणे आणि पोलीस कॉन्स्टेबल पोळ यांचा समावेश होता.















Discussion about this post