जळगाव l स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे जळगावकर रसिकांसाठी कथक नृत्याचा विशेष कार्यक्रम ‘कथा-कथक’ आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम प्रख्यात कथक नृत्यांगना निधी संजीव प्रभू सादर करणार आहेत. निधी या डॉ. मंजिरी देव व पंडित मुकुंदराज देव यांच्या शिष्य असून, त्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या अलंकार व मुंबई दूरदर्शनच्या ग्रेडेड आर्टिस्ट आहेत.
निधी संजीव प्रभू यांना कलाश्री, गुणगौरव, युवारत्न, कलानैपुण्य, नृत्यरत्न, पं. पलुस्कर यांसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना मुंबई विद्यापीठाचा मानाचा ‘मेनका’ किताबही प्राप्त आहे. त्यांनी चक्रधर संगीत महोत्सव, कथक कला केंद्र दिल्ली, काला घोडा महोत्सव, पं. राम मराठे महोत्सव, पं. गोपीकृष्ण संगीत महोत्सव यांसारख्या मानाच्या महोत्सवांमध्ये आपली कला सादर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व ब्रिक्स अध्यक्षांपुढे नृत्य सादर करण्याचा मानही त्यांना मिळाला आहे.

निधी यांनी लंडनच्या वुमन आर्टिस्ट फेस्टिवल, इजरायलच्या मार्को पोलो फेस्टिवल यांसह कजाकस्तान, किर्गिस्तान येथेही आपली कला सादर केली आहे. त्यांनी कथक आणि फ्लेमिंगो जुगलबंदी या अनोख्या संकल्पनेवर आधारित अनेक देशी-विदेशी कार्यक्रम केले आहेत. ‘कृष्णंशरणम’ या संगीत नाटकात त्या राधाची भूमिका, तर पंडित जसराज यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘गीत गोविंद’ नाटकात प्रमुख भूमिका साकारत आहेत.
त्यांनी ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील ‘मोहे रंग दो लाल’ गाण्यात, तसेच ‘बंदिश बँडिट’, ‘डान्स प्लस’ यांसारख्या ओटीटी आणि टेलिव्हिजन कार्यक्रमांत सहभाग घेतला आहे. त्या आता कोरिओग्राफर म्हणूनही कार्यरत असून माधुरी दीक्षित, एकता कपूर यांच्या प्रोडक्शन हाऊससाठी तसेच ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या शोसाठी नृत्यदिग्दर्शन केले आहे. त्या जगप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या ‘हीरामंडी’ वेब सिरीजसाठीही नृत्यदिग्दर्शन करत आहेत.
नुकताच त्यांचा गायक राहुल देशपांडे आणि गायिका आशा भोसले यांच्यासोबत विशेष कार्यक्रम संपन्न झाला. त्या ‘नादनिधी’ या स्वतःच्या नृत्य अकादमीच्या माध्यमातून भारत व विदेशातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात.
कार्यक्रमाची स्वरूप व संगीत साथ
या विशेष कार्यक्रमात तबला साथ रोहित देव (मुंबई), गायन व संवादिनीवर अजिंक्य पोंक्षे, तर बासरीवर निरंजन भालेराव (औरंगाबाद) यांची साथ असणार आहे. कार्यक्रमापूर्वी अनुभूती इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी आणि गुरु अमृतांशू शांडिल्य यांचे शिष्य तबला सोलो सादर करणार आहेत.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सौ. ज्योतिभाभी जैन आणि सपना काबरा आर्ट स्टुडिओच्या संचालिका सपना काबरा यांची असणार आहे.
रविवार, २ मार्च २०२५रोजी सायं. ६:३० वा. भैय्यासाहेब गंधे सभागृह, जळगाव येथे होणाऱ्या या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून प्रेक्षकांनी कृपया १० मिनिटे आधी आसनस्थ व्हावे आणि जळगावच्या रसिकांनी या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन चांदोरकर प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाने केले आहे.















Discussion about this post