जळगाव । पारोळा तालुक्यातील मेहु गावातील विद्यमान महिला सरपंच, महिला सरपंचाचे पती, मुलगा आणि सेतू सुविधा केंद्र चालक अशा चारही जणांना ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना जळगावच्या एसीबी पथकाने रंगेहात अटक केल्याने खळबळ उडाली आहे. प्रकरणी पारोळा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील मेहु गावात सात लाख रुपयाची व्यायामशाळा बांधण्यासाठी धनश्री कंट्रक्शन या कंपनीला करार देण्यात आला होता. या प्रकल्पासाठी २०२३ मध्ये लोकनियुक्त सरपंच म्हणून जिजाबाई गणेश पाटील यांची निवड झाली होती. त्यानंतर धनश्री कंट्रक्शनच्या प्रतिनिधीने सरपंचांकडे मंजूर निधीची मागणी केली. यावेळी सरपंचांनी सात लाख रुपयांपैकी चार लाख रुपयांचा धनादेश कंपनीला दिला होता. उर्वरित तीन लाख रुपयांचा निधी देण्यासाठी सरपंचांनी ७० हजार रुपयांची लाच मागितली.
सरपंच जिजाबाई गणेश पाटील यांचा पती गणेश सुपडू पाटील यांनी या रकमेची तडजोड करून ती ४० हजार रुपयांवर आणली. त्यानंतर सरपंचांचा मुलगा शुभम गणेश पाटील आणि सेतू सुविधा केंद्र चालक समाधान देवसिंग पाटील याला लाच स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिले. समाधान पाटील यांनी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना जळगावच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोकॉ राकेश दुसाने, पोकॉ अमोल सुर्यवंशी यांनी सापळा रचला. त्यांनी लाच घेताना या चौघांना रंगेहाथ पकडले.त्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (ला.प्र.वि,नाशिक पोलीस अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी म्हणून योगेश ठाकूर (पोलीस उपअधीक्षक लाप्रवि जळगांव), सापळा अधिकारी व तपास अधिकारी नेत्रा जाधव (पोलीस निरीक्षक, ला प्र.वि जळगाव), सापळा पथक GPSI दिनेशसिंग पाटील, GPSI सुरेश पाटील, पोकॉ राकेश दुसाने, पोकॉ अमोल सुर्यवंशी यांनी कारवाई केली.















Discussion about this post