मुंबई । गेल्या काही दिवसापासून राज्यातील तापमानात चढ-उतार दिसून येत आहे. मुंबईसह इतर भागांत वातावरणात लक्षणीय बदल झाले आहेत. रात्रीच्या वेळेस आणि पहाटेच्या दरम्यान थंडी जाणवते, तर दिवसा प्रचंड उकाडा नागरिकांना सहन करावं लागत आहे. हवामान विभागानुसार ही स्थिती पुढील आठवडाभर कायम राहण्याची शक्यता आहे. बदलत्या हवामानाचा नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत आहे, आणि यामुळे आरोग्याच्या बाबतीत अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. नागरिकांना यासाठी सावधगिरी बाळगण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.
राज्याच्या काही भागांत किमान तापमानात वाढ झाली आहे, ज्यामुळे थंडीचा प्रभाव कमी होत असल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर, दिवसा सूर्याच्या कडक उष्णतेमुळे अनेकांना असह्य होरपळ सहन करावी लागत आहे. या बदलत्या हवामानामुळे नागरिकांची अडचणी वाढत असून, हवामानातील असंतुलन त्यांच्या दैनंदिन जीवनावर प्रभाव टाकत आहे. ही परिस्थिती सध्या अनेकांसाठी त्रासदायक ठरत आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीमध्ये सांगितले की, सध्या पश्चिमी वाऱ्यांचा वेग वाढला आहे, ज्याचा सर्वाधिक प्रभाव वायव्य भारतात दिसून येत आहे. या बदलामुळे उत्तर भारतातील मैदानी भागांमध्ये गारठा कमी झाला आहे. राज्यातील वातावरणात मात्र दिवसभरात हिवाळा आणि उन्हाळा या दोन्ही ऋतूंचा अनुभव नागरिकांना विविध प्रहरांमध्ये घेता येत आहे. हवामानाची ही स्थिती काही काळासाठी कायम राहण्याची शक्यता असून, मुंबई, उपनगर, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही हेच वातावरण दिसणार आहे.















Discussion about this post