जळगाव । वीजपुरवठ्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिरसोली युनिटचा वायरमन विक्रांत अनिल पाटील उर्फ देसले (३८, रा. माऊली नगर, जळगाव) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई अजिंठा चौफली परिसरात करण्यात आली.
संभाजीनगर परिसरातील तक्रारदारांच्या घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी नवीन खांब टाकण्यात आले होते. त्या खांबावरून वीजपुरवठा मिळण्यासाठी तक्रारदार शिरसोली येथील महावितरण कार्यालयात वेळोवेळी गेले असता वायरमन विक्रांत पाटील याने सदरचे काम करून देण्यासाठी ३० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
यापैकी १० हजार रुपये या अगोदर घेतले होते. मात्र तरीदेखील वीजपुरवठा मिळत नव्हता. त्यासाठी उर्वरित २० हजार रुपयांची मागणी होत असल्याने या विषयी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १८ ऑक्टोबर रोजी तक्रार दिली होती. सदर तक्रारीप्रमाणे पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी करण्यात आली. त्यानुसार वरिष्ठ तंत्रज्ञ अनिल देसले पाटील याला उर्वरित २० हजार रुपये लाचेची रक्कम घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, किशोर महाजन, राकेश दुसाने आदींच्या पथकाने यशस्वी केला.















Discussion about this post