जळगाव । जळगाव शहरात घरफोडीचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नसून अशातच शहरातील अयोध्या नगरात तरूणाचे बंद घर फोडून घरातून सोन्या चांदीचे दागिने असा एकुण ६४ हजार ४५० रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, सुरज राजेंद्र भामरे वय ३५ रा. अयोध्या नगर, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ज्वेलर्स दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतो. त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी घराचे कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातून ६४ हजार ४५० रूपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने चोरून नेले.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी सुरज भामरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर हे करीत आहे.