जळगाव । प्रचंड एनर्जीने सादर केलेले आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे भारतीय लोक समुह नृत्य, भारतीय परंपरेला साजेसे शास्त्रीय नृत्य, भारतीय सुगम संगीत आणि रांगोळी, मेहंदी या कला प्रकारांनी युवक महोत्सवाचा स्पर्धेचा शेवटचा दिवस अविस्मरणीय ठरला. दरम्यान उद्या सोमवार दि. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ सुप्रसिध्द अभिनेते अंशुमन विचारे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग व्दारा आयोजित आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाला २४ ऑक्टोबर पासून सुरू आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी सकाळच्या सत्रात रंगमंच १ (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह) वर भारतीय समुह नृत्य स्पर्धा झाल्या या कला प्रकारात कोळीनृत्य, आदीवासी नृत्य, राजस्थानी नृत्य, गोंधळ, शेतकरी नृत्य, धनुची नृत्य, कर्नाटकी नृत्य, यक्षगण, लावणी, छत्तीसगडी लोकनृत्य आदी नृत्यप्रकार पारंपारीक वेशभुषा आणि नाद, ताल व लय याची सांगड घालत उत्कृष्टपणे सादर करण्यात आले. या स्पर्धेत प्रेक्षकांना पारंपारिक संस्कृतीचे दर्शन घडविले. ही स्पर्धा दिवसभर चालली. यामध्ये २५ पेक्षा अधिक समूहनृत्य सादर झाले.
रंगमंच ३ (ताराराणी सभागृह) वर भारतीय सुगम संगीत स्पर्धा झाली. गझल, गवळण, अभंग, भावगीते सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली. स्पर्धकांनी जीवलगा, मी राधीका, हम तेरे शहरमे, अंदाज आरशाचा, मन लोगो रे लागो, कानडा राजा पंढरीचा, रंजीशही सही, दुधात नाही पाणी, अच्युतम केशवम अशी एकापेक्षा एक सरस सुगम गीते सादर केली. या स्पर्धेत ३० स्पर्धकांनी भाग घेतला.
रंगमंच २ (राजमाता जिजाऊ सभागृह) वर भारतीय शास्त्रीय नृत्य स्पर्धा झाली. यात भरतनाट्यम, कथक नृत्य सादर करण्यात आले. सुरेख वेशभुषा आणि चेहऱ्यावरील हावभाव या अदांना उपस्थितांनी दाद दिली. या कलाप्रकारात ९ सहभाग नोंदविला.
रंगमंच ५ (राणी दुर्गावती सभागृह) वर सकाळ सत्रात इन्स्टॉलेशन या स्पर्धेत टाकाऊ पासून टिकावू संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी परिसरात असलेल्या टाकाऊ वस्तू दिलेल्या वेळेत गोळा करून त्यामधून कलात्मक देखण्या कलाकृती तयार केल्या यामध्ये पाणी अडवा पाणी जिरवा, विकसित भारत, ग्रामीण संस्कृती, भारतीय अर्थव्यवस्था, विज्ञान व तंत्रज्ञान, शेतकरी आत्महत्या, राष्ट्रीय एकात्मता, मुली वाचवा, भारतीय ज्ञान परंपरा, भारताचे संविधान, जी-२०, पर्यावरण, औद्योगिकीकरण आदींचा आविष्कार घडविला. या स्पर्धेत ४५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
याच रंगमंचावर दुपारच्या सत्रात रांगोळी या कला प्रकारातील स्पर्धेसाठी विविधतेत एकता आणि उत्सव हे दोन विषय देण्यात आले होते. एकुण ७४ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला. अडीच तासाच्या वेळेत स्पर्धकांनी रांगोळी रेखाटून भारतीय एकात्मतेचे तसेच भारतातील सण आणि परंपरा दर्शविणाऱ्या रांगोळीचा सुंदर आविष्कार घडविला. याच रंगमंचावर सायंकाळी मेहंदी या कलाप्रकाराची स्पर्धा सुरू झाली. यंदा ८० पेक्षा अधिक स्पर्धक यात सहभागी झाले. आज विविध रंगंमंचाना कुलगुरू प्रा. व्ही.एल.माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे, व्य.प.सदस्य राजेंद्र नन्नवरे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य यांनी भेटी दिल्या.
उद्या समारोप :-
विद्यापीठाच्या या युवक महोत्सवाचा समारोप उद्या सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता पदवीप्रदान सभागृहात होणार आहे. कुलगुरू प्रा. व्ही.एल.माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार असून सुप्रसिध्द अभिनेते अंशुमन विचारे यांच्या हस्ते पारितोषिके दिली जाणार आहेत. यावेळी प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे, महोत्सवाचे कार्याध्यक्ष तथा व्य.प.सदस्य राजेंद्र नन्नवरे यांची उपस्थिती असणार आहे.