धुळे । राज्यात महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल हे मी ठासून सांगत आहे, असं ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना भाजप नेते ना गिरीश महाजन यांनी राऊतांवर टिकास्त्र डागलं आहे.
आता त्यांना घरीच बसण्याची वेळ येणारं आहे आणि सकाळी उठून पोपटपंची सारखं बोलण्याची वेळ येणार आहे, अशा शब्दांत मंत्री गिरीश महाजन यांनी नाव न घेता संजय राऊत यांना पुन्हा टोला लगावला आहे. संजय राऊत यांच्या खोट्या नरेटीव्हला आता जनता बळी पडणार नाही, असंही महाजनांनी ठामपणे सांगितलं आहे. राज्यातून उत्तर महाराष्ट्रच महायुतीला सर्वात जास्त जागा देणार आणि महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन होणार असा विश्वास गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
भाजपाचे धुळे शहराचे उमेदवार अनुप अग्रवाल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन धूळ्यात उपस्थित आहेत. महाजन यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वीच्या शक्ती प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी संजय राऊतांवर नाव न घेता हल्लाबोल केला आहे. भव्य शक्तिप्रदर्शन झाल्यानंतर भाजप उमेदवार अनुप अग्रवाल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.