मुंबई । राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून या निवडणुकीत सर्वांचे लक्ष बारामतीकडे असणार आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पवारांच्या बारामतीत यंदा अटीतटीची लढत होणार आहे. अजित पवारांच्या विरोधात शरद पवार यांच्याकडून कोणाला उमेदवारी मिळेल? याबाबत उत्सुकता होती. अखेर शरद पवार यांनी अजित पवारांच्या विरोधात त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी देणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे बारामतीत आता निवडणुकीच्या रिंगणातही काका विरूद्ध पुतण्या संघर्ष पाहायला मिळणार आहे.
युगेंद्र पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. युगेंद्र पवार यांना एबी फॉर्म दिल्याचीही माहिती आहे. अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासूनच ‘बारामती’ नक्की कुणाची? याची चर्चा होत आहे. अशातच आता विधानसभेची निवडणूक होत आहे. या मतदारसंघातून पवार घराण्यातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाणार आहे. शरद पवार यांचे पुतणे आणि अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार विधानसभा लढणार आहेत. राज्याच्या राजकारणात काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार यांच्यात संघर्ष सुरु आहे. अशातच आता बारामतीच्या निवडणुकीतही काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार आहे.
लोकसभेनंतरची बदललेली समिकरणं
लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली. पण या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. त्यानंतर आता विधानसभेची निवडणूकही पवार विरूद्ध पवार अशी होणार आहे.