पारोळा : पारोळा तालुक्यातील शेळावे बुद्रुक शिवारात शेतात फवारणीचे काम सुरु असताना यासाठी विहिरून पाणी काढताना शेतकऱ्याचा पाय घसरला. यामुळे विहिरीतील पाण्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. वासुदेव त्रंबक पाटील (वय ६२) असे घटनेत मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली
पारोळा तालुक्यातील शेळावे बु. या गावातील वासुदेव पाटील हे चिखलोड शिवारातील शेतात कपाशी पिकावर औषध फवारणीच्या कामासाठी गेले होते. दरम्यान दुपारी मुलगा शेतात गेल्यानंतर ते शेतात दिसून आले नाही. यामुळे त्याचा शेतात शोध घेतला असता औषध फवारणी करण्याचा पंप हा विहिरीच्या बाजूला पडलेला दिसून आला. यामुळे मुलाने विहिरीत डोकावून पाहिले असता वडिल विहिरीच्या पाण्यात पडलेले दिसले.
त्याने सदरची बाब गावात सांगितल्यानंतर कुटुंबीय व ग्रामस्थ शेतात आले. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढुन पारोळा कुटीर रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आला असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हिरालाल पाटील हे करीत आहेत.















Discussion about this post