आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सत्तेत असलेल्या महायुतीमध्ये जागा वाटपावरुन रस्सीखेच सुरू आहे. विधानसभेच्या जागांसाठी शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्षामध्ये कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी जागा वाटपाबाबत सर्वात महत्वाचे विधान केले आहे.
विधानसभा निवडणुकसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला जवळपास ६० जागा मिळतील, असे सर्वात महत्वाचे विधान अजित पवार यांनी केले आहे. युवक राष्ट्रवादीच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी आपण ६० एक जागा लढवणार असल्याचे म्हटले आहे.
“आमची जागा वाटपात तसेच इतर जागांबाबत चर्चा सुरू आहे. आपल्याकडे सध्या असलेले आमदार आहेतच तिथे आपल्याला काम करायचे आहे. त्या ५४ जागा आपल्याला मिळतील आणि अजून 60 जागांपर्यंत आपल्याला मतदारसंघांमध्ये काम करायचे आहे. काँग्रेसचे आमदार आपल्यासोबत आहेत. हिरामण खोसकर आणि सुलभा खोडके, झिशान सिद्दीकी, शामसुंदर शिंदे, देवेंद्र भुयार आपल्याबरोबर आहेत,” असे अजित पवार यावेळी म्हणाले.
तसेच “आपल्याला तीन वेगवेगळ्या पद्धतीने काम करायचे आहे. तुम्हाला आम्ही तशी यादी देऊ. तुम्ही अजितबात गाफील राहू नका. आपल्याला न मिळणाऱ्या जागेवर शक्ती खर्च करु नका. संवाद साधताना आपलेपणाने बोला. शांतपणाने, डोक्यावर बर्फ ठेऊन संवाद साधा. उगाच बाहेर काढा रे त्याला, असं करु नका. बाहेर काढा म्हणल्यावर आपल्यालाच बाहेर जावं लागेल. कृपा करुन काम करा, दुर्लक्ष करु नका,” असे म्हणत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांनाही विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले.
Discussion about this post