चिपळूण : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील रहिवाशी असलेल्या भोंदूबाबाचा चिपळूण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. भोंदूगिरी करणाऱ्या भोंदूबाबासह दोघांना येथील पोलिसांनी दोन महिलांच्या सहकार्याने रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी दोघांवर अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश बाबुराव वायकर (५०, रा.मुदखेडा, जामनेर, जळगांव), अशोक देवराम जोशी (४०, रा.वावडी, जामनेर, जळगांव) अशी पकडलेल्या दोघां भोंदूबाबांची नावे आहेत. भोंदूबाबा गणेश वायकर व त्याचा साथीदार अशोक जोशी हे दोघेजण गेल्या काही महिन्यांपासून चिपळूणमधील मार्कडी येथील रश्मी पॅलेस समोरील कुंजवन इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील सदनिकेत भोंदूगिरी करीत होते. याची माहिती घेऊन पर्दाफाश करण्याचा निर्णय घेतला. यानुसार यातील एक महिला या दोघा भोंदूबाबांकडे गेली. या दोघांकडे आपल्याला यश मिळत नसल्याचे सांगितले. यावर या दोघांनी तुमच्यावर करणी केलेली आहे. ही करणी दूर करण्यासाठी ३० हजार रुपये लागतील तर व्यवसायात यश येण्यासाठी दीड लाख रुपये लागतील सांगितले.
यांनतर दोन महिलांनी चिपळूण पोलिस ठाण्यात आले आणि पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांना सर्व माहिती दिली. यानंतर पोलिसांनी कुंजवन इमारतीवर या दोन महिलांसमवेत छापा टाकला. यावेळी करणी दूर करण्यासाठी लिंबूसारखे साहित्य रचून ठेवल्याचे निदर्शनास आले. याबाबत फिर्यादीचे जाबजबाब नोंदवून घेतल्यानंतर पोलिसांनी दोघांवर अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.















Discussion about this post