नवापूर । पिंपळनेर गावी जाणारी बस हुकल्याने खासगी वाहनाची वाट पाहत बसलेल्या आदिवासी मजूर महिलेवर रविवारी रात्री दोन संशयितांनी बैलबाजार मार्केटमधील शेडमध्ये तिच्या मुलादेखत आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला. गस्तीवर असलेले पोलिस पीडितेला सामोडे चौफुलीवर भेटले असता तिने आपबिती कथन केली. पोलिसांनी काही वेळातच नीलेश सतीश निकम (वय ३२) आणि स्वप्निल शिवाजी वाघ (वय २६) या दोन संशयितांना जेरबंद केले.
नवापूर तालुक्यातील ही ३९ वर्षीय पीडित महिला तिच्या मुलासह सटाणा येथील कांदा व्यापाऱ्याकडे मजुरीसाठी गेली होती. मजुरीकाम संपल्याने ती व मुलगा सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सटाणा येथून घरी जाण्यास निघाले. रात्री ८ वाजता पिंपळनेर येथून त्यांना गावी जाण्यासाठी बस नसल्याने वाहनाची वाट पाहत ते थांबले होते.
रात्री ११ वाजेच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी त्यांच्याजवळ येऊन थांबली. चालक व एका व्यक्तीने त्यांची विचारपूस केल्यावर महिलेला बैल मार्केटमधील ओट्यावर ओढून नेत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर वाहनासह पळ काढला. पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३७६ सह अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ कलम ३ (१) फ याप्रमाणे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस, उपनिरीक्षक भूषण शेवाळे व पथकाने संशयितांना जेरबंद केले
Discussion about this post