जळगाव । जळगाव शहरातील सौरभ ज्वेलर्सवरील दरोडाप्रकरणी पुणे येथून एका जणाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची कसून चौकशी केली जात असून, त्याच्या साथीदाराचा व मुद्देमालाचा शोध सुरू आहे. याशिवाय इतर दोन जणांची चौकशीही पोलिसांनी केली.
शहरातील सराफ बाजारात भवानी मंदिराजवळ असलेल्या सौरभ ज्वेलर्समध्ये सोमवारी पहाटेच्या सुमारास तीन दुचाकीवरून आलेल्या सहा दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. या ठिकाणाहून दरोडेखोरांनी २५ लाख ४७ हजारांचे सोन्याचे दागिने, ६ लाख ५० हजारांची चांदीचे दागिने व ३२ हजारांची रोकड, असा एकूण ३२ लाख २९ हजार ५७४ रुपयांचा ऐवज घेऊन दरोडेखोर पसार झाले होते.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शहरातील सर्व पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांची बैठक घेऊन त्यांना तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा, शनिपेठ पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. त्यानंतर पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही पथके संशयितांच्या शोधार्थ वेगवेगळ्या दिशेने रवाना झाली होती.















Discussion about this post