मुंबई : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची जाहीर झालेली निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. राजकीय पक्षांच्या मागणीनंतर या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाने ८ मे रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील एकूण ४ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. यात मुंबई, कोकण पदवीधर आणि नाशिक, मुंबई शिक्षक मतदारसंघाचा समावेश होता. या ४ जागांसाठी १० जूनला मतदान आणि १३ जून रोजी निकाल जाहीर होणार असल्याचे निवडणूक आयोगाने याआधी जाहीर केले होते. पण आता या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुका घ्याव्यात असे निवेदन निवडणूक आयोगाला देण्यात आले होते. याची दखल घेत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
मुदत ७ जुलै रोजी संपणार
मुंबई पदवीधर संघातील सदस्य विलास विनायक पोतनीस, कोकण पदवीधरमधील निरंजन वसंत डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघातील किशोर भिकाजी दराडे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातील सदस्य कपिल हरिशचंद्र पाटील यांची मुदत ७ जुलै रोजी संपत आहे. या ठिकाणी निवडणुका होणार आहेत.















Discussion about this post