जळगाव । सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून यादरम्यान आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडल्या जात आहे. याच दरम्यान जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या नावे मनोज जरांगेंसंदर्भात फेक पोस्ट व्हायरल होत आहे.
निवडून आल्यास आपण मनोज जरांगे यांना अटक करणार असल्याची स्मिता वाघ यांची बनावट पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून याबाबत स्मिता वाघ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. याबाबत कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती स्मिता वाघ यांनी दिली.
व्हायरल पोस्टबाबत स्मिता वाघ यांचे स्पष्टीकरण
स्मिता वाघ म्हणाल्या की, निवडणूक तोंडावर असताना पराभव समोर दिसू लागल्याने विरोधकांनी राजकारण किती खालच्या पातळीवर नेले आहे हे यातून दिसत आहे. मात्र यासंदर्भात आपण कायदेशीर कारवाई करणार आहे. मराठा महासंघाने मला पाठींबा जाहीर केला आहे. मराठा समाजाने पाठींबा दिला म्हणून यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. इतक्या खालच्या पातळीवरचे राजकारण विरोधक करत असतील तर जनता यांना कधीच माफ करणार नाही.
जातीचा आधार घेऊन बदनामी करणे योग्य नाही
मी आजपर्यंत पर्यंत जरांगे पाटील साहेबांचे नावे देखील घेतले नाही. जरांगे पाटील यांची भूमिका योग्य आहे. त्यांच्या आंदोलनाला माझा विरोध असण्याचे काहीही कारण नाही. एबीपी माझाचे नाव वापरून जर कोणी अशा पद्धतीच्या पोस्ट व्हायरल करत असेल तर ते योग्य नाही. या लोकांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मला जनतेवर विश्वास आहे की, जनता अशा चुकीच्या पोस्टवर कधीही विश्वास ठेवणार नाही. तुम्हाला बोलायचं तर विकासावर बोला मात्र जातीचा आधार घेऊन बदनामी करणार असाल तर ते योग्य नाही, असे स्मिता वाघ यांनी म्हटले आहे.















Discussion about this post