जळगाव । राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आपल्या पक्षाच्या तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी राज्यभर सभा घेत आहेत.काही ठिकाणी मुक्काम करून ते आपल्या पक्षाच्या तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी काही रणनीतीही आखून देत आहेत. याच प्रमाणे शरद पवार येत्या शुक्रवारी (ता. ३) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या तीन सभा होणार आहे. यादरम्यान ते जळगाव येथे मुक्कामी थांबणार आहेत. नाराजांशी चर्चेसह निवडणुकीच्या रणनीतीविषयी ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निवडणुकीचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे या दौऱ्याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
या ठिकाणी होणार सभा
३ मे रोजी शरद पवार यांची रावेर मतदारसंघातील उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ सभा होईल. हेलिकॉप्टरने जळगाव विमानतळावर ते सकाळी दहाला येतील. अकरा ते दुपारी एकपर्यंत चोपडा येथे जाहीर सभा, साडेतीन ते साडेचारपर्यंत भुसावळ येथे सभा, तर सायंकाळी सात ते रात्री आठपर्यंत मुक्ताईनगर येथे जाहीर सभा घेणार आहेत.
मुक्ताईनगरातील सभा आटोपल्यावर शरद पवार जळगाव येथे रात्री मुक्कामी असणार आहेत. या वेळी ते काहींच्या भेटीही घेणार असल्याचे सांगण्यात येते. काही जणांशी चर्चा करणार आहेत.
जळगाव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गटाचे करण पवार उमेदवार आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) श्रीराम पाटील उमेदवार आहेत. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांच्या यशासाठी शरद पवार काय रणनीती ठरवितात, याकडे लक्ष असेल.















Discussion about this post