सगळीकडे लोकसभा निवडणुकीची धुमधाम सुरु आहे. अनेक पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहे. परंतु राज्यातील महायुतीमध्ये सुरु असलेल्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नाहीय. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात वर्षा निवासस्थानी बुधवारी रात्री राज्यस्तरीय बैठक पार पडली असून या बैठकीत जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली. महायुतीतील जागावाटपासंदर्भात झालेल्या या बैठकीनंतर शिवसेनेच्या 8 जागांची घोषणा मुख्यमंत्री शिंदे करु शकतात अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे.
महाराष्ट्रात भाजपने अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेसोबत युती केली आहे. महायुतीमधील भाजपने राज्यात २३ उमेदवार जाहीर केले आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने एक उमेदवार जाहीर केला. मात्र शिंदे गटाने अद्याप कोणताही उमेदवार जाहीर केला नाहीय. त्यामुळे महायुतीमध्ये काही जागांवरून ताणाताणी सुरु आहे.
मात्र महायुतीतला जागावाटपाचा सस्पेन्स आज संपणार आहे. बुधवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली असून यात जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली. याच पार्श्वभूमीवर आज गुरुवारी महायुतीची संयुक्त पत्रकार परिषदही होणार आहे. या पत्रकार परिषदेत जागावाटपाची घोषणा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करतील.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उमेदवारीची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी सिंधूदुर्ग मतदारसंघ भाजपकडे आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रत्नागिरी सिंधूदूर्ग मतदारसंघातून नारायण राणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.















Discussion about this post