मुंबई । लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येतेय तसतसे राजकीय घडामोडीला वेग येत आहे. राज्यातील महायुतीसह महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नसला तरी यातील काही पक्षांनी आपले उमेदवारांची यादी जाहीर केलीय. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवरील घडामोडींवर भाष्य करताना मोठा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप तर घडून येणार नाही ना? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
ठाकरे गटाकडून आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 17 जागांचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. पण यापैकी सांगली आणि उत्तर पश्चिम मुंबई या दोन जागांवर जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. या दोन्ही जागांवर काँग्रेसचा दावा होता. विशेष म्हणजे सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आमदार विश्वजीत कदम हे दिल्ली पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी गेले आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडेच राहावी, अशी विनंती विश्वजीत कदम यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.
दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमध्ये काडीमोड करत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर केले आहेत. या घडामोडी पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केला आहे. महाविकास आघाडीतून अनेक लोकं बाहेर पडतील, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
“महाविकास आघाडीमध्ये कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. सगळे एकमेकांच्या सीटवर उमेदवार घोषित करत आहेत, अशी परिस्थिती आहे. अनेक लोकं महाविकास आघाडीतून बाहेर पडलीत. वंचित आणि महाविकास आघाडीत काय झालं? हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्या संदर्भात मला काहीही बोलायचं नाही, अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली.















Discussion about this post