अमळनेर । सध्या फसवणुकीच्या घटना प्रचंड वाढल्या असून अशातच अमळनेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सैन्यात नोकरी लावून देण्याचे आमिष देत दोन लाख रुपये घेतले होते. दिलेली हि रक्कम परत न मिळत नव्हती शिवाय नोकरी देखील मिळाली नाही. या तणावातून एका तरुणाने आत्महत्या केली. सागर संजय बैसाणे असं मयत तरुणाचे नाव आहे.
याबाबत असे की अमळनेर तालुक्यातील देवळी येथील सागर संजय बैसाणे हा २०२१ मध्ये म्हैसाळ (जि. सांगली) येथे मानसी करियर अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत होता. त्यावेळी तेथील प्रशिक्षक सुशांत सुनील उबाडे, अकादमीचे संस्थापक अनिल भरत कांबळे, महादेव विलास सातपुते यांनी ७ एप्रिल २०२२ रोजी सागर याला सैन्य दलाच्या ‘बीआरओ’मध्ये नोकरीला लावण्यासाठी साडेसहा लाख रुपयांची मागणी केली होती. त्यावेळी सागरने त्यांना एक लाख रुपये दिले.
दरम्यान ऑक्टोबर २०२२ मध्ये सुशांत उबाळे याने पुन्हा एक लाख रुपयांची मागणी केली. तिघांनी सागर याला सरकारी नोकरी न देता कॅन्टीनमध्ये मजुरीला लावून दिले. सागर याने दिलेले दोन लाख रुपये परत मागितले असता त्यांनी नकार दिला. म्हणून वैतागून सागर याने रेल्वे खाली झोकून देत आत्महत्या केली. या प्रकरणी सागरचे काका सुभाष बैसणे यांनी अमळनेर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून, पोलीलिस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ तपास करीत आहेत.















Discussion about this post