जळगाव । राज्यासह जळगावमध्ये कमाल तापमान सातत्याने वाढत असून, उन्हाळा सुरू झाल्याचे चित्र आहे. जळगाव शहराचे तापमान ३७ अंशांपार असल्याने उन्हाचा चटका अधिक तापदायक होत असून, उकाड्यात वाढ झाल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.
खऱ्या अर्थाने उन्हाळ्याचा चटका मार्चच्या अखेरीत जाणवू लागला आहे. दोन दिवसांपासून पारा ३७ अंशांवर पोहोचल्याने नागरिक हैराण झाले आहेत. उन्हाळ्याच्या झळा जाणवत असून, उन्हामुळे दिवसा घराबाहेर जाणे नागरिक टाळत आहेत. रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. वाढत्या उन्हामुळे गॉगल, टोप्या, रूमाल, शीतपेय आदींची मागणी वाढली आहे.वातावरणातील बदलामुळे आरोग्यावरही परिणाम जाणवू लागला आहे. लहान मुले व वयोवृद्धांना उन्हाचा जास्त फटका बसला आहे. पारा वाढू लागताच ऊन लागण्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. तसेच नाकातून रक्त येणे, सर्दी-तापाच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे.
जळगावच्या तापमानात मागील काही दिवसात बदल पाहायला मिळाले. पंधरा दिवसापूर्वी जळगावचे दिवसाचे तापमान ३१ अंशाखाली होते. तर रात्रीचे तापमान १२ अंशावर आले होते. यामुळे उन्हाळ्यात थंडीचा अनुभव जळगावरकरांना आला होता. मात्र मागील काही दिवसापासून तापमानात वाढ होत आहे. शनिवारी पारा ३६ अंशांवर होता. तो रविवारी एक अंशांनी वाढून ३७.७ पर्यंत गेला. तर सोमवारी व मंगळवारी तापमानाचा पारा ३७ अंशांवर होता. सकाळी दहापासून चटके बसत होते. दुपारी तर संपूर्ण बाजारपेठ, वर्दळीच्या रस्त्यावरील वाहतूक मंदावली होती.
दिवसाच्या वेळेस हवेची कमाल गती तशी ३२ किलोमीटर प्रतितास होती. आकाश सकाळपासूनच निरभ्र होते. यामुळे आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार १८ ते २३ मार्चदरम्यान कमाल तापमान सरासरी ३९ अंशांच्या आसपास राहील. तर किमान तापमान १९ अंशांपेक्षा जास्त नसेल. आकाश निरभ्र राहील.















Discussion about this post