जळगाव । राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर केलेल्या वक्तव्याचा मंत्री गिरीश महाजन यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. एकनाथ खडसे हे काँग्रेसमध्ये काम करत होते. हरिभाऊ जावळे यांची बॅग घेऊन फिरताना मी त्यांना बघितले भाजप सोडल्यानंतर त्यांची ताकद संपली, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.
1990 मध्ये विधानसभेचे त्यांना तिकीट मिळाले आणि ते निवडून आले या गोष्टीचा मी साक्षीदार आहे. सरकारमध्ये आल्यानंतर सर्वात जास्त खाते त्यांना मिळाले. कोणता वाईट काळ त्यांनी बघितला आहे. तुम्ही पक्षप्रवेश घेतल्यानंतर पहिल्यांदा निवडून आले हे तुम्ही विसरू नका. खडसेंचा हा स्वार्थीपणा आहे. त्यांनी कोणाला शिकवू नये. टाळूवरचं लोणी खायला आले आहेत आणि ते आम्हाला शिकवणार आहेत का? अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. याबाबत गिरीश महाजन म्हणाले की, मी त्यांच्यासोबत राहिलो आहे. त्यांची काय ताकद होती ते मला माहित आहे. पक्षासोबत होता म्हणून त्यांची ताकत होती पक्ष सोडला आता त्यांचं काय राहिले? त्यांच्या गावातली सात लोकांची ग्रामपंचायत सुद्धा त्यांची नाही, जिल्हा बँक त्यांची नाही, जिल्हा दूध संघ त्यांच्याकडे नाही.
त्यांच्या मुलीला ते त्यांच्या मतदारसंघातून निवडून आणू शकत नाही. पण माझ्यामुळे सर्व काही आहे हा समज त्यांचा आता दूर झाला असेल. भाजपमध्ये होता म्हणून तुमची किंमत होती आज तुम्ही बाजार सोडून गेला आज तुम्ही कुठेच राहिला नाहीत, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.















Discussion about this post