जळगाव । डाळ प्रोसेसिंग कंपनीत डाळीवर पॉलिश करण्याच्या मशीनमध्ये साडीचा पदर अडकून ३८ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. अपघातात मशीनच्या पट्टयात अडकून महिलेचे डोके धडापासून वेगळे होऊन पडले होते. घटनेची माहिती मिळताच मिलमध्ये इतर विभागात काम करणाऱ्या कामगारांनीही गर्दी केली.
एमआयडीसीतील व्ही सेक्टरमधील या प्लॉटमध्ये अँग्रो इंडस्ट्रीज ही डाळमिल आहे. या कंपनीत गोविंदा नानू ठाकरे व त्यांची पत्नी सरस्वतीबाई गोविंदा ठाकरे (वय ३०, रा. सुहाजी, मध्य प्रदेश) हे दाम्पत्य कंपनीतच राहून डाळीला पॉलिश करण्याचे काम करत होते. मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास
गोविंदा ठाकरे हे खाली मशीनवर काम करत असताना सरस्वतीबाई ही महिला मशीनवर बसून डाळीवर पाणी टाकण्यासाठी बसल्या होत्या.
खाली डाळ एकीकडून दुसरीकडे घेऊन जाणाऱ्या पट्टयात अचानक साडीचा पदर अडकल्याने क्षणार्धात सरस्वतीबाई मशीनमध्ये ओढली गेली, त्यात तिचे डोके शरीरापासून वेगळे होऊन पडले. तिला पती गोविंदा यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले असता सीएमओ निरंजन देशमुख यांनी मृत घोषित केले, दरम्यान, या घटनेने सरस्वतीबाई यांच्या कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला. या प्रकरणी जळगाव येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नीलेश गोसावी हे करीत आहे.















Discussion about this post