कल्याण/मुरबाड: महाराष्ट्रात सुरू असलेले अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. आज कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील रायते पुलावर सिमेंट मिक्सर आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या इको कारचा भीषण अपघात झाला. या हृदयद्रावक घटनेत इको कारमधील ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, उर्वरित प्रवासी गंभीर जखमी आहेत. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून वेगाने जाणाऱ्या कारला काळाने गाठल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सदर इको कार कल्याणहून मुरबाडच्या दिशेने प्रवासी घेऊन जात होती. ५ आसनी क्षमता असलेल्या या कारमध्ये चालकाने तब्बल १२ प्रवासी कोंबून भरले होते. रायते पुलावर कार सुसाट वेगाने जात असताना समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सर ट्रकशी तिची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.
अपघाताचा मोठा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलीस आणि महामार्ग प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून गाडीचे पत्रे कापून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. या सर्वांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान ८ जणांना मृत घोषित करण्यात आले.
मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू
या भीषण अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये ५ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे. अद्याप कोणाचीही ओळख पटलेली नसून, टिटवाळा पोलीस मृतांची नावे आणि पत्ता शोधण्याचे काम करत आहेत. गंभीर जखमींवर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
अवैध वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या अपघातामुळे नियम धाब्यावर बसवून चालणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ५ लोकांच्या पासिंगवर १२-१२ प्रवासी भरून चालणारी ही ‘मृत्यृदूत’ वाहने प्रवाशांच्या जिवावर बेतत आहेत. आरटीओ आणि पोलीस प्रशासन अशा वाहनांवर कधी ठोस कारवाई करणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.















Discussion about this post