आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असता त्यातच विरोधी पक्षातील नेते पदाधिकारी सत्ताधारी पक्षात प्रवेश घेताना दिसत आहे. अशातच आता सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटात दिग्गज नेत्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. यामुळे अजित पवार गटाची ताकद आणखी वाढणार आहे. ४ माजी आमदार अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत.
शिराळाचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक, जतचे माजी आमदार विलासराव जगताप, कवठेमहांकाळचे माजी मंत्री अजित घोरपडे आणि आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख हे दिग्गज नेते अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नुकताच त्यासंदर्भात एक महत्वाची बैठक देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मिरज येथील शासकीय गेस्ट हाऊसमध्ये पार पडली.
सांगलीमध्ये झालेल्या अजित पवार गटाच्या बैठकीला विलासराव जगताप, अजित घोरपडे, राजेंद्र देशमुख आणि शिवाजीराव नाईक हे उपस्थित होते, या नेत्यांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षप्रवेश याबाबत चर्चा देखील पार पडली. त्याचसोबत अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांशी चर्चा होऊन या सर्व माजी आमदारांचा पक्षप्रवेश होईल, असं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सांगण्यात येत आहे.
Discussion about this post