अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा एकदा प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने जगात खळबळ उडाली आहे. वॉशिंग्टन डीसी येथील हिल्टन हॉटेलमध्ये आयोजित ‘व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनर’ या हाय-प्रोफाईल कार्यक्रमात हा गोळीबार झाला. सुदैवाने, अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांच्या तत्परतेमुळे डोनाल्ड ट्रम्प आणि इतर सर्व मान्यवर सुखरूप असून, प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत हल्लेखोर ठार झाला आहे.
भाषणादरम्यान कडाडल्या बंदुका
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्यासपीठावरून पाहुण्यांना संबोधित करत असताना अचानक गोळीबाराचे आणि स्फोटांचे आवाज ऐकू आले. यामुळे हॉटेलमध्ये एकच खळबळ उडाली. यूएस सिक्रेट सर्व्हिसच्या एजंट्सनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून काही सेकंदातच ट्रम्प यांच्याभोवती सुरक्षा कवच (Human Shield) तयार केले. त्यांना खाली बसवून अत्यंत सुरक्षितपणे हॉलबाहेर नेण्यात आले.
हॉटेलात भीतीचे वातावरण; पाहुणे टेबलखाली लपले
हॉटेलमध्ये अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स, ट्रम्प यांच्या पत्नी आणि मंत्रिमंडळातील अनेक महत्त्वाचे सदस्य उपस्थित होते. अचानक झालेल्या गोळीबारामुळे उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जीव वाचवण्यासाठी अनेक मान्यवर आणि पाहुणे हॉटेलमधील टेबलखाली लपून बसले होते. काही वेळ हॉटेलमध्ये नेमके काय घडत आहे, हे कोणालाच समजत नव्हते.
हल्लेखोर ठार, मोठा अनर्थ टळला
सुरक्षा यंत्रणांना या संभाव्य धोक्याची पूर्वसूचना मिळाली होती. एका सतर्क सुरक्षारक्षकाने हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याने गोळीबार सुरू केला. मात्र, सिक्रेट सर्व्हिसच्या एजंट्सनी चपळाई दाखवत हल्लेखोराला जागीच ठार केले. हल्लेखोराच्या निशाण्यावर थेट राष्ट्राध्यक्ष ट्रम्प होते, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. सुरक्षा यंत्रणांच्या वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळे एक मोठा अनर्थ टळला आहे.
अतिशय सुरक्षित समजल्या जाणाऱ्या हिल्टन हॉटेलमध्ये आणि राष्ट्राध्यक्षांच्या उपस्थितीत इतका मोठा हल्ला झाल्याने अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ट्रम्प यांच्या सुरक्षेत काही त्रुटी राहिली का? हल्लेखोर शस्त्रासह हॉटेलमध्ये कसा पोहोचला? याचा तपास आता सुरू झाला आहे. सध्या सर्व मान्यवर सुरक्षित स्थळी असून परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.















Discussion about this post