जळगाव । चोपडा शहरात झालेल्या प्रदीप राजेंद्र माळी (महाजन) यांच्या निर्घृण खून प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) अवघ्या २४ तासांत यश आले आहे. मुंबईला पळून गेलेल्या दोन मुख्य आरोपींना नाशिक ते चाळीसगाव दरम्यान धावत्या रेल्वेतून पोलिसांनी अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.
नेमकी घटना काय होती?
तारामती नगरमधील रहिवासी प्रदीप माळी (वय ३३) यांचा १९ एप्रिलच्या रात्री ९ ते २० एप्रिलच्या सकाळी ८:३० वाजेच्या दरम्यान अज्ञात हत्याराने चेहरा आणि डोके ठेचून खून करण्यात आला होता. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा केल्यानंतर संशयित आरोपी विजय भास्कर वैदकर आणि निर्मल संजय बडगुजर हे मुंबईला फरार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे त्यांचा मागोवा घेतला. आरोपी दादर येथून रेल्वेने पुन्हा जळगावकडे येत असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी सापळा रचला. एलसीबीचे पथक नाशिक रेल्वे स्थानकावर पोहोचले आणि जळगावकडे येणाऱ्या रेल्वेत चढून शोध सुरू केला. अखेर नाशिक ते चाळीसगाव दरम्यान धावत्या रेल्वेत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या.
पूर्ववैमनस्यातून झाला खून
सुरुवातीला आरोपींनी गुन्ह्याची कबुली देण्यास टाळाटाळ केली. मात्र, पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर आरोपी विजय वैदकर याने जुन्या वादातून (पूर्ववैमनस्य) हा खून केल्याची कबुली दिली. संशयित चेतन सुभाष कानडे याच्या सांगण्यावरून हे कृत्य केल्याची माहितीही समोर आली असून, चेतन कानडे याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.















Discussion about this post