जळगाव : एकीकडे मातीकलेतून वात्सल्याचे प्रतिक असलेली आई साकारणारी तरणाई, वक्काs… वक्काss… असे पाश्चिमात्य गाणे गात सभागृहात सर्वांना थिरकायला भाग पाडणारी तरणाई, दुसरीकडे भारताच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रभावावर परखड मते मांडणारी आणि प्रहसनाव्दारे विनोद निर्मिती करत अंतर्मुख करणारी तरुणाई अशी कितीतरी तरुणाईची रुपे युवारंग युवक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मुळजी जेठा महाविद्यालयाच्या प्रांगणात अनुभवायला मिळाली.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि केसीई संस्थेचे मुळजी जेठा महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाला ८ ऑक्टोबर पासून प्रारंभ झाला आहे. सोमवारची सकाळ रंगमंच क्र.५ वरील कला महर्षि केकी मूस सभागृहात कोलाज या कला प्रकाराने सुरु झाली. या स्पर्धेत ४८ स्पर्धकांनी भाग घेतला. फ्लॉवर पॉट, सफरचंद व एखादे फळ असा विषय परीक्षकांनी दिला होता. कोलाजव्दारे स्पर्धकांनी हुबेहुब फ्लॉवर पॉटचे दर्शन घडविले. मेहंदी या कला प्रकारात ८४ जणांनी भाग घेतला. पूर्ण हातभर मेहंदी स्पर्धकांनी सोबत्याच्या हातावर रेखाटल्या. मूळात मेहंदीची प्रकृती थंड असल्यामुळे शरीराचे तापमान योग्य ते राखून शरीरात थंडावा देत असते. पूर्ण हातभर मेहंदी काढल्यामुळे ऑक्टोबरच्या हिट मध्ये ही मेहंदी काहीशी थंडावा देऊन गेली.
याच सभागृहात दुपारी मातीकला या कला प्रकारातील स्पर्धेसाठी आई व मूल आणि संगीत हे दोन विषय देण्यात आले होते. एकूण ३६ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. अडीच तासाच्या वेळेत स्पर्धकांनी मातीकलेतून मातृत्वाचा सुंदर आविष्कार घ्डविला. मूल आणि आई यांच्यातील तरल नाते मूर्तीकलेतून जिवंत झालेले दिसून आले. तर काही स्पर्धकांनी संगीत वाद्य मातीकलेतून साकारले.
याच सभागृहात स्थ्ळ छायाचित्रण स्पर्धेत ४६ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यात त्यांनी त्यांच्या कल्पकतेला वाव देत सुंदर, अप्रतिम अशा स्थ्ळ छायाचित्रणाचे सादरीकरण करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
रंगमंच क्र.२ पद्मश्री ना.धो.महानोर सभागृहात पाश्चिमात्य समुह गीत गायन स्पर्धा झाली. सर्वाधिक लोकप्रिय असलेले ब्राझीलचे वक्का वक्का, माय लव माय हार्ट, सी यू अगेन, आदी श्रवणीय समुहगीत सादर करतांना या गीतांवर प्रेक्षकांनाही ठेका धरायला लावला. पाश्चात्य वेशभूषा, केशभूषा, देहबोली हे सर्व काही भारावून टाकणारे होते. रंगमंच क्र.४ भारतरत्न लता मंगेशकर रंगमंचावर पाश्चिमात्य गायन स्पर्धेत १२ स्पर्धकांनी भाग घेतला. त्यानंतर दुपारच्या सत्रात झालेल्या पाश्च्मिात्य वादन स्पर्धेत ८ स्पर्धकांनी भाग घेतला. गिटार, ड्रमसेट, कीबोर्ड, व्हायोलिन आदी वाद्य तन्मयतेयने वाजवली.
रंगमंच क्र.१ कवयित्री बहिणाबाई चौधरी खुल्या रंगमंचावर दिवसभर प्रहसनाव्दारे प्रेक्षकांना विविध विषयांवर विचार करायला स्पर्धकांनी भाग पाडले. विविध क्लृप्त्या योजून हास्य निर्माण करणारे प्रहसन रसिकांना अंतर्मूख करीत होते. मणिपूर प्रकरण आणि महिलांवरील अत्याचार, सत्य-असत्याचा शोध, सोशल मिडीयाचे दुष्परिणाम, वाहतूकीचे नियम, राजकारण, शाकाहार आदी विविध विषय हाताळून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सादरीकरण केले. या स्पर्धेत १९ संघांनी भाग घेतला.
रंगमंच क्र.३ पूज्य सानेगुरुजी रंगमंचावर वादविवाद स्पर्धा रंगली. आंतरराष्ट्रीय पटलावर भारताचा प्रभाव आहे / नाही हा विषय स्पर्धेसाठी होता. समर्थन व विरोधात मते मांडतांना विद्यार्थ्यांचे वाचन, बौध्दिक प्रगल्भता आणि चौफेर अभ्यास दिसून आला. अत्यंत पोटतिडकीने विषयाच्या अनुकुल बाजूने मत मांडणाऱ्या विद्यार्थ्याच्या मताचे खंडन प्रतिकूल बाजू मांडतांना त्याच पध्दतीने केले जात होते. या स्पर्धेत ५९ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी उन्हाचा तडाखा बसत असतांनाही स्पर्धकांमध्ये चैतन्यदायी उत्साह होता. भोजन व निवास व्यवस्था उत्तम असल्यामुळे स्पर्धक संयोजनावर समाधानी होते. युवारंगाचे कार्याध्यक्ष व व्यवस्थापन परीषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, व्यवस्थापन परीषद सदस्य, युवारंगाचे स्वागताध्यक्ष व केसीई संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.सुरेखा पालवे, नितीन झाल्टे, डॉ. पवित्रा पाटील यांनी विद्यार्थी व्यवस्थेच्या ठीकाणी व विविध रंगमंचास भेट दिली. यावेळी अधिसभा सदस्य दीपक पाटील, डॉ.मंदा गावीत, प्रा. जयंत मगर, प्रा. दिनेश चव्हाण, प्राचार्य संजय भारंबे व विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. जयेंद्र लेकूरवाळे, डॉ.जुगलकीशोर दुबे, डॉ. मनोज महाजन, डॉ.विजय लोहार हे उपस्थित होते.
Discussion about this post