जामनेर । कॅफेत बसलेल्या तरुणाला जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली. घरी पोहोचल्यावर जखमी तरुणाचा मृत्यू झाल्याची जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथे घडली.सुलेमान रहिमखान पठाण (२१, रा. बेटावद खुर्द, ता. जामनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात जमावाच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर १० संशयितांची रात्री उशिरा ओळख पटली. पैकी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
सुलेमान हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता मुलगा होता. जामनेर शहरातील एका सायबर कॅफेत तो एका अल्पवयीन मुलीसोबत बसल्याची माहिती त्याच्या गावातील काही तरूणांना मिळाली होती. त्यानुसार, तरूणांच्या टोळक्याने सोमवारी सायंकाळी कॅफेवर जाऊन सुलेमानला बेदम मारहाण केली.
तेवढ्यावरच न थांबता त्याला बसस्थानकावर तसेच बेटावद येथे गेल्यानंतर त्याच्या घराजवळही मारहाण केली. जमावाच्या मारहाणीत जखमी झालेला सुलेमान घरी गेल्यानंतर पाणी प्यायला. त्यानंतर भोवळ येऊन त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, आपल्या गावातील एका तरूणाचा जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची माहिती मिळताच दुसऱ्या समुदायाने जामनेर पोलीस ठाण्यात गर्दी केली. त्या ठिकाणी संशयितांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी त्यांनी ठिय्या देखील मारला.
त्यामुळे जामनेर पोलीस ठाण्याच्या परिसरात काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी वेळीच धाव घेऊन जमावाला शांत करून कायदा हातात न घेण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. सुलेमानला मारहाण करणाऱ्या जमावातील १० जणांची ओळख पटली असून, त्यापैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उर्वरित संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाल्याची माहिती डॉ.रेड्डी यांनी दिली. मृत सुलेमानचे वडील रहीम पठाण यांनी तक्रार दिल्यानंतर जामनेर पोलीस ठाण्यात जमावाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असल्याचेही डॉ.रेड्डी यांनी सांगितले.
Discussion about this post