जळगाव : जामनेर तालुक्यातील पहूर येथे बेलपाने तोडताना जमिनीवर तुटून पडलेल्या विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने बहिणीला विजेचा धक्का बसला. हा प्रकार भावाच्या लक्षात आल्याने त्याला त्यानं तिला बाजूला करत वाचवले. यावेळी त्याचाच पाय तुटलेल्या विजेच्या तारेवर पडल्याने भावाचा बहिणीसमोरच करुण अंत झाला आहे. समाधान मोरे (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव आहे. महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे त्यामुळे तुटलेल्या विजेच्या तारांमुळे तरुणाचा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे.
पहूरपेठ गावातील रहिवासी समाधान मोरे हे बेलाची पाने तोडून शहरांमध्ये विक्री करण्यासाठी घेऊन जातात. मोरे कुटुंब मोल मजूरी आणि बेलाच्या पानांची विक्री करुन उदार्निवाह करतात. अवघ्या काही दिवसांवर श्रावण महिना असल्याने त्यापार्श्वभूमीवर बेलाची पाने तोडण्यासाठी नेहमी प्रमाणे समाधान व त्याची बहीण आशा तसेच चुलत बहीण सारिका खराटे व मंजुळा घोडेस्वार हे शनिवारी पहाटे पाच वाजता पहूर गावापासून काही अंतरावर लोंढ्री खुर्द शिवारातील रवींद्र बाविस्कर यांच्या शेतात बेलाची पाने तोडण्यासाठी गेले.
याठिकाणी गवत वाढलेले असल्यामुळे या गवतात जमीनीवर तुटून पडलेल्या विजेच्या तारा नजरेस पडल्या नाहीत आणि बेलाची पाने तोडण्याच्या कामात आशा मोरे हिचा पाय विजेच्या तारांवर पडला, बहिणी आशाला हिला विजेचा धक्का बसल्याचे लक्षात आल्यावर समाधान याने वेळ न दवडता, तात्काळ तिला उचलून बाजूला केले, व तिचा जीव वाचविले. मात्र हे करताना समाधानचा तोल गेला आणि त्याचाच पाय सदरच्या विजेच्या तारांवर पडला.
यावेळी समाधान याची बहीण आशा तसेच त्याच्या चुलत बहिणी सारिका आणि मजुंळा यांनी जोरजोरात आरडाओरड करत भावाला वाचवा, भावाला वाचवा म्हणत प्रचंड आक्रोश केला. आक्रोश ऐकून सकाळी शेतात जाणाऱ्या शेतकरी तसेच मजुरांनी घटनास्थळी धाव घेतली, समाधान ला जखमी अवस्थेत पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यत उशीर झाला होता आणि समाधान याची प्राणज्योत मालवली होती. वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजस बोरसे यांनी तपासणी करून समाधानला मृत घोषित केले.. समाधान याच्या पश्चात आई वडील दोन भाऊ आणिदोन बहिणी असा परिवार आहे.