पाचोरा। पाचोरा तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आलीय. आई, वडील शेतात गेले असताना मुलानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तारखेडा खुर्द येथे ही घटना घडली असून हर्षल जुलाल पाटील (वय २७, रा. तारखेडा खुर्द ता. पाचोरा) असे मयताचे नाव आहे. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान हर्षल याच्या आत्महत्येमागचे कारण समोर आलेले नाही.
पाचोरा तालुक्यातील तारखेडा खुर्द येथे हर्षल पाटील कुटुंबियांसह वास्तव्यास होता. हर्षलचे आई वडील शेती करतात. तर हर्षल गेल्या दोन वर्षापासून वीजवितरण कंपनीत कंत्राटी वायरमन म्हणून काम करत होता. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे हर्षलचे आई वडील सकाळी शेतात गेले होते. हर्षल दुपारी घरी आला. यावेळी घरी तो एकटाच होता. यादरम्यान हर्षलने लोखंडी ग्रीलचा दरवाजा बंद केला आणि लाकडी दरवाजा उघडा ठेवून घरात दोराच्या सहाय्याने छताला गळफास लावून जीवन संपवले.
शेतातील काम आटोपून हर्षलचे आई वडील दुपारी दोन वाजता घरी परतले. घराचा लोखंडी दरवाजा उघडला व घरात प्रवेश करताच आई वडिलांना हर्षल गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. हर्षलला पाहाताच दोघांनी हंबरडा फोडला. सर्व काही सुरळीत असताना हर्षलने टोकाचे पाऊल का उचलले हा प्रश्न सर्वांना पडला आहे. हर्षलच्या आत्महत्येचे नेमके कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक नरेंद्र नरवाडे करत आहेत.
Discussion about this post