पुणे । MPSC परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवार हिची हत्या झाल्याच्या घटनेला अवघे काहीच दिवस उलटले आहे. या घटनेने अख्या महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. अशातच आता पुण्यात आज दर्शना पवार हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता राहिली.
MPSC करणाऱ्या तरुणीवर मित्राचा कोयत्यानं हल्ला केला आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत ही घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे. आधी दर्शना पवार हत्या प्रकरण आणि त्यानंतर समोर आलेली ही घटना यामुळे भावी अधिकारी गुन्हेगारीच्या गर्तेत अडकतायत की, काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ज्यावेळी तरुणानं त्याच्या मैत्रिणीवर कोयत्यानं हल्ला केला, त्यावेळी तिच्यासोबत त्यांचा आणखी एक मित्रही होता. तरुणानं तिच्यावर कोयत्यानं हल्ला केला. त्यावेळी हल्ल्यात जखमी झालेली तरुणी जीव मुठीत घेऊन सदाशिव पेठेत पळत सुटली. तिचा मित्र कोयता घेऊन तिच्या मागे पळत होता. ती उपस्थितांकडे मदतीसाठी याचनाही करत होती. पण तिच्या मदतीसाठी कोणीही पुढे आलं नाही.
काही काळानं एक तरुण तिच्या मदतीसाठी धावून आला. कोयता हातात असलेला तरुण तरुणीच्या डोक्यावर प्रहार करणार एवढ्यात मदतीसाठी धावून आलेल्या तरुणानं कोयता धरला आणि हल्लेखोर तरुणाला रोखलं. त्यानंतर इतर लोक पुढे आले आणि हल्लेखोर तरुणाला चोप दिला. उपस्थितांनी घडलेल्या धक्कादायक प्रकाराची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतलं आहे.
Discussion about this post