चाळीसगाव । जिल्ह्यात गुन्हेगारी काही कमी होण्याचे नाव घेत नाहीय. अशातच चाळीसगाव तालुक्यात दुचाकी दुरुस्तीच्या वादातून गॅरेज चालक तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. महेश संतोष बोरसे असं या मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मोटार सायकल चालकाविरुद्ध मेहुणबारे पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक असे की, मेहुणबारे पोलिस स्टेशन हद्दीत बळाळ कसबे या गावी महेश संतोष बोरसे याचे मोटार सायकल दुरुस्तीचे शिवशक्ती मोटार नावाचे गॅरेज होते. या गॅरेजवर ज्ञानेश्वर निंबा मासरे (कोळी) याने मोटारसायकल दुरुस्तीचे काम केले मात्र मोटारसायकलमधे पुन्हा बिघाड झाल्याने शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गॅरेजवर पुन्हा आला. माझी मोटारसायकल आत्ताच्या आता दुरुस्त करून दे म्हणत त्याने तगादा लावला. यावेळी गॅरेज चालक महेश बोरसे याने माझे काम सुरू ाहे, थोडे थांब तुझी मोटारसायकल दुरुस्त करुन देतो, असे सांगितले मात्र मासरे ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने शाब्दिक वाद वाढत गेला व मासरे याने महेश बोरसे यास जमिनीवर आपटताच त्याचा र्मत्यू झाला.
दरम्यान, वाद सुरू असतांना महेश बोरसे याचे वडील वाद सोडवण्यास आले होते. त्यांना देखील ज्ञानेश्वर याने शिवीगाळ व दमदाटी केली होती. या घटनेप्रकरणी मयत महेश बोरसे याचे वडील संतोष तुकाराम बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मेहुणबारे पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक विष्णू आव्हाड करीत आहेत.
Discussion about this post