जळगाव । व्यवसाय सुरू करण्यासाठी सावकाराकडून कर्ज घेतलं होते. पण कर्ज परत फेडू शकत नसल्यामुळे सावकाराकडून पैशांची वारंवार मागणी होत होती. या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या तरुणाच्या पत्नीने सावकारावर अनेक गंभीर आरोप केले. सावकराविरोधात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून जळगावातील चंदू अण्णा नगरमध्ये राहणाऱ्या मुकेश पाटील या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाच्या आजारपणासाठी आणि कोरोना काळात व्यवसायासाठी मुकेश पाटीलने एका सावकाराकडून कर्ज घेतले होते. मुकेशकडून कर्जाचे पैसे द्यायला उशिर होत होता त्यामुळे सावकाराच्या जवळच्या काही व्यक्तींनी आणि साथीदारांनी धमकावले आणि शिवीगाळ केला असा आरोप मुकेशच्या पत्नीने केला.
मुकेशची दुचाकी देखील सावकाराचा साथीदार लवेशने आपल्या मित्रांच्या मदतीने हिसकावून घेतली. सावकाराच्या या जाचाला कंटाळून मुकेश पाटीलने राहत्या घरी आत्महत्या केली. शेजारी राहणाऱ्यांना घटनेची माहिती मिळाली त्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. मुकेशच्या पत्नीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार केली.
नातेवाइकांनी लवेश चव्हाण आणि इतरांवर गुन्हा दाखल करून अटकेची मागणी केली. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा मुकेशच्या नातवाईकांनी घेतला. त्यामुळे जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
Discussion about this post