जळगाव : वडिलाने १० वर्षीय मुलादेखत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे घडलीय. समाधान भास्कर कुंभार (वय ३८, रा. पटेलवाडा, ममुराबाद) असे मृताचे नाव आहे.
समाधान कुंभार यांचा वीटभट्टीचा व्यवसाय आहे. गुरुवारी (१५ मे) सकाळी साडेनऊला समाधान विटांचे ट्रॅक्टर खाली करण्यासाठी जळगावात १० वर्षीय मुलगा वैभव याच्यासह आले होते. तेथील काम आटोपल्यावर पिता- पुत्र गावाकडे परत निघाले. ममुराबाद येथे आल्यावर म्हाळसादेवी मंदिराजवळ समाधान कुंभार यांनी ट्रॅक्टर थांबविले. मुलाला ट्रॅक्टरवर बसवून समाधान यांनी जवळच्या विहिरीत उडी घेतली.
हा प्रकार समजल्यावर ग्रामस्थांसह तरुण मदतीला धावले. काहींनी तालुका पोलिसांना घटना कळविली. तब्बल सहा तासांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. मृत समाधान कुंभार यांच्या पश्चात पत्नी ज्योती, मुलगी राणी, मुलगा वैभव असा परिवार आहे. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
Discussion about this post