यावल । यावल तालुक्यातील किनगाव गावाजवळ भरधाव एस.टी. बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अशोक यशवंत सपकाळे (वय 62) असं मयताचे नाव असून या घटनेप्रकरणी बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावलहून जळगावकडे जाणाऱ्या (एमएच 14 बी.टी. 2144 ) क्रमांकाच्या एस.टी. बसने किनगाव येथील कृषी विद्यालयासमोर (एमएच 19 एटी 8588) क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात अशोक सपकाळे यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर बाजार समितीचे उपसभापती बबलू कोळी, सचिन तडवी, गुड्डू पिंजारी यांनी जखमी सपकाळे यांना तत्काळ किनगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप ठाकूर व सुनिल पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघातग्रस्त बस आणि दुचाकी जप्त केली. बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक सपकाळे हे जेडीसीसी बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे.
Discussion about this post