मुंबई | राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींची चर्चा सुरू झाली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच पक्ष आणि मंत्रिमंडळात बदल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. लोकसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील कामगिरीचा आढावा घेत काही मंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र वगळता इतर जिल्ह्यांमध्ये अपेक्षित यश मिळाले नसल्याने २ ते ४ मंत्र्यांना इशारा देण्यात आल्याची चर्चा आहे. लवकरच काहींना जबाबदारीतून मुक्त करून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, शिवसेना पक्षाच्या सर्व जिल्हासंपर्क प्रमुख, नेते आणि सचिवांना संघटना मजबूत करण्यासाठी गावपातळीवर आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणुकीत अपेक्षित यश का मिळाले नाही, कुठे त्रुटी राहिल्या याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे समजते.
महापालिका निवडणुकांमध्ये ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर वगळता इतर भागांत पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर संबंधित मंत्र्यांच्या कामगिरीची गंभीर दखल घेतली जात असल्याचे बोलले जाते.
तसेच काही प्रमुख नेत्यांच्या नातेवाईकांनाही निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने संघटनात्मक बांधणीबाबत नव्याने विचार सुरू झाला आहे. आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती.
आता संभाव्य फेरबदलात कोणाला डच्चू मिळणार आणि कोणाला मंत्रीपदाची संधी मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.














Discussion about this post