मुंबई : आज महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोड घडली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज युती सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली.
दरम्यान, अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यांनतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागली आहे.
विधानसभेतील सध्याचं संख्याबळ पाहिल्यास काँग्रेसकडे सर्वाधिक आमदार आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद देखील काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसमधील तीन नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. यात जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांनी देखील विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. काकासाहेब कुलकर्णी यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच विरोधी पक्ष नेते होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात लोकशाही संपावण्याचा विडा भाजपने उचलेला आहे अशी टीका देखील त्यांनी केली आहे.
Discussion about this post