जळगाव । ड्रगमाफिया ललित पाटील याला पोलिसांनी अखेर अटक केली असून यानंतर त्याने मी पळालो नाही तर पळवलं गेलं, असा खळबळजनक दावा केल्याने राज्याच्या राजकारणात मोठं वादळ उठण्याची चिन्ह आहे. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोठं वक्तव्य केल्यानंतर आता अशातच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठा सवाल उपस्थित केला आहे. ललित पाटीलला आश्रय देणारा कोण?, असा प्रश्न खडसे यांनी केला आहे.
एकनाथ खडसे यांनी या प्रकरणी ट्विट केलं आहे. या ट्विटमधून खडसे यांनी यामागे राजकीय शक्तीचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.’ड्रगमाफिया ललित पाटील याला आश्रय देणारी चाळीसगावातील ती व्यक्ती कोण? ड्रगमाफिया ललित पाटील पुण्याच्या ससून रुग्णालयातून फरार झाला होता. तिथून तो चाळीसगावात येऊन तीन दिवस राहिला, अशी माहिती समोर येत आहे.
चाळीसगावात त्याला आश्रय देणारी व्यक्ती कोण ? त्याच्या मागे कोणती राजकीय शक्ती आहे? तो कोणाच्या सांगण्यावरून चाळीसगावात आला होता? याचे उत्तर मिळण्यासाठी ललित पाटीलची नार्को टेस्ट करावी. कोणताही राजकीय दबाव झुगारून पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करावी व सत्य जनतेसमोर आणावे. ड्रगमाफियाच्या चाळीसगावातील ‘त्या’ आश्रयदात्याच्या मुसक्या आवळाव्यात.’, असं खडसे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Discussion about this post