पुणे । राज्यात जुलै महिन्यात सर्वत्र चांगला पाऊस झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात राज्यात सर्वसाधारण पाऊस होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने दडी मारली आहे. राज्यात गेल्या दहा दिवसात पाऊस झालेला नसून पावसाची ही विश्रांती २० ऑगस्टपर्यंत असणार आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
जून महिन्यात राज्यात दाखल झालेल्या पावसाने जुलै महिन्यात अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार हजेरी लावली. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने बळीराजाने खरीप हंगामातील कामे देखील आटोपून टाकली. मात्र, ऑगस्ट महिना सुरू होताच राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे.दरवर्षी ऑगस्टच्या १० तारखेपर्यंत राज्यात सरासरी १०० मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, यंदा ऑगस्टमध्ये आत्तापर्यंत पावसाची तीव्र तूट नोंदली गेली आहे. आतापर्यंत ऑगस्ट महिन्यात राज्यात केवळ ३७.३ मिलिमीटर नोंदला गेला आहे.
पावसाने दडी मारल्याने डोलात आलेल्या पिकांनी माना टाकल्या असून, शेतकऱ्यांच्या चितेंत वाढ झाली आहे. त्यामुळे पाऊस नेमका कधी पडणार? असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडला असून अनेकांचे डोळे आभाळाकडे गेले आहेत. दरम्यान, पावसाची ही विश्रांती २० ऑगस्टपर्यंत असणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
Discussion about this post