जळगाव । शहरातील रामानंदनगर भागात असलेल्या विवेकानंद नगरात महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्षामुळे गटारी तुंबल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या भागातील नागरिकांनी संबंधितांकडे वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.मात्र या भागातील काही गल्लीमध्ये नियमित साफसफाई होते.याच्या मागील कारण काय?असा ही सवाल नागरिक करीत आहेत.
शहरातील रामानंदनगर भागात असलेल्या विवेकानंद नगरात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छता केली जाते. यामध्ये नाली साफ करणे, रस्ते झाडून स्वच्छ करणे तसेच डास होवू नये म्हणून फवारणी करणे, उन्हाळ्याचे दिवस असल्याकारणाने कुलर वापरणा-यांच्या कुलरमध्ये डास प्रतिबंधक औषध टाकणे, याशिवाय विविध भागात असलेला कचरा ट्रॅक्टरद्वारे जमा करून नेणे आदी कामे केली जातात. परंतु विवेकानंद नगरात गेल्या तीन आठवड्यांपासून स्वच्छतेअभावी परिसरातील गटारी अक्षरक्ष: तुंबल्या असून ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढून आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. महापालिकेचे कर भरून देखील नागरी सुविधा उपलब्ध होत नसल्याने परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
मनपाच्या आरोग्य विभागाकडून शहराच्या साफसफाई आणि कचरा संकलन करण्यासाठी कोट्यावधी रूपयाचा ठेका देण्यात आला आहे. शहरातील काही प्रभागांमध्ये नियमित साफसफाई केली जाते, मात्र प्रभाग क्र. 11 मधील विवेकानंद नगर परिसरात गेल्या तीन आठवड्यांपासून साफसफाई का केली जात नाही ? मालमत्ता कर भरूनही नागरी सुविधा का मिळत नाही ? असे नानाविध प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान मनपा प्रशासनाने शहरासह विवेकानंद नगर परिसरातही नियमितपणे साफसफाई करावी. अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे.
Discussion about this post