पुणे | बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या आणि खंडणी प्रकरणी मुख्य संशयित असलेला वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेला. वाल्मिक कराडला 15 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला बीड शहर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी आता एसआयटी देखील स्थापन करण्यात आली. दरम्यान, वाल्मिक कराड हा शरण आल्याने विरोधी पक्षाकडून पोलीस तपासावर संशय व्यक्त केला जातोय. आरोपी स्वतः सरेंडर होत असेल तर मग पोलीस यंत्रणा काय करतेय?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
अशात महाविकास आघाडीच्या एक बड्या नेत्याने अत्यंत धक्कादायक दावा केला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर बीड पोलीस ठाण्यात पाच पलंग आणण्यात आले, असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला होता. त्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील या प्रकरणी अत्यंत खळबळजनक दावा केलाय. माध्यमांशी बोलताना त्यांनी कराडबाबत मोठा दावा केलाय.
विजय वड्डेटीवार यांनी वाल्मिक कराडचे एन्काऊंटर होऊ शकते, असं वक्तव्य केलंय. पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड याचे लाड पुरवले जात आहेत. त्याच्यासाठी पोलीस ठाण्यात बेड आले. पोलीस आतापर्यंत कधी कॉटवर झोपले नाही. मग हे कोणाचे लाड करत आहे. याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी देखील विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
विजय वडेट्टीवार यांची मोठी मागणी
इतकंच नाही तर, आरोपीचे लाड पुरवण्याची ही सुरुवात आहे, हळूहळू टिव्ही, एसी, पंचतारांकित हॉटेल मधील जेवण सगळच मिळेल, असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला. कराडवर या सरकारला निष्पक्ष कारवाई करायची आहे का? करायची असेल तर बीड जिल्ह्याच्या बाहेर चौकशी आणि तपास केला पाहिजे. ज्याने पोलिसांना आतापर्यंत आपल्या धाकात ठेवले ते त्याची चौकशी करणार की सेवा? सरकारने कराड वर कारवाई करण्याचे नाटक एकतर बंद करावे आणि कारवाई करायची असेल तर ती गांभीर्यपूर्वक करावी. कराड वर अजून ही संतोष देशमुख हत्या असो की मकोका अंतर्गत गुन्हा ही दाखल झालेलं नाही, त्यामुळे या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय.
Discussion about this post