बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत असून या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोललं जात आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा असून याप्रकरणी सातत्याने धनंजय मुंडेंवर आरोप होताना दिसत आहेत. आता अशातच नवीन प्रकरण समोर आले ज्याने वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
वाल्मिक कराड याने ऊस हार्वेस्टिंग करणाऱ्या मशीन मालकांना अकरा कोटी वीस लाखाची टोपी घातल्याचा प्रकार उघड झाला असून याबाबत पंढरपूर परिसरातील फसवणूक झालेल्या 19 मशीन मालक शेतकऱ्यांचे जबाब पोलिसांनी नोंदवून घेतले आहे. त्यांच्याकडून तक्रारी अर्ज दाखल केले आहेत.
आता या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार असून या 11 कोटी 20 लाखाची फसवणूक झालेल्या सर्व मशीनधारकांना त्यांच्या जवळील पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. यातील तथ्य तपासून पुढील दोन दिवसात वाल्मिक कराड, जितेंद्र पालवे आणि नामदेव सानप यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांचा आरोप काय?
ऊस हार्वेस्टिंग करणाऱ्या राज्यातील जवळपास 140 शेतकरी मशीन धारकांना 36 लाखाचे अनुदान मिळवून देतो म्हणून वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकार्याने प्रत्येकी आठ लाख रुपये देण्यास सांगितले होते. तात्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे हे आपले निकटवर्ती असून आम्ही तुम्हाला हे अनुदान मिळवून देतो, असे सांगत या सर्व 140 जणांकडून प्रत्येकी आठ लाख रुपये घेतल्याची तक्रार या शेतकऱ्यांची आहे. यासाठी 14 सप्टेंबर 2024 रोजी धनंजय मुंडे यांची वाल्मिक कराड यांनी सह्याद्री अतिथीगृहावर भेट घडवून आणल्याचा गोप्यस्फोटही या तक्रारदारांनी केला आहे. यावेळी मुंडेंनीही आश्वासन दिल्याचा दावा या शेतकऱ्यांचा आहे.
मात्र अद्याप ते दिलेले नाही. तसेच अनुदान मागायला गेलेल्या शेतकऱ्यांना वाल्मिक कराडने मारहाण केल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात आला आहे.
Discussion about this post