मुंबई । प्रहारचे आमदार बच्चू कडू सध्या मुंबईत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या घराबाहेर आंदोलन करत आहेत. सचिन ऑनलाईन गेमिंगची जाहीरात करतो आणि याच मुद्द्यावरुन बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून सचिन तेंडुलकरच्या घरासमोर आंदोलन सुरू केले आहे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
काही दिवसांपूर्वीच त्यांनी सचिन तेंडुलकरच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकरच्या घरासमोर आंदोलन केलं.
बच्चू कडू म्हणाले की, “खरं तर आम्हाला बरेच फोन, मेसेज येत आहेत. काही ठिकाणी तर पैसा गुंतवून या जुगारावर लावला आहे. ऑनलाईन गेमिंगची तुम्ही जर जाहीरात करताय, तर मग मटक्याचीही करा, ते कशाला सोडताय? भारतरत्न असल्यामुळे आम्ही आंदोलन करत आहे. ते फक्त क्रिकेटर असते तर आम्ही आंदोलन केलं नसतं. या देशात भगतसिंहांना भारतरत्न मिळाला नाही, अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळाला नाही, महात्मा फुलेंना मिळाला नाही. मग ज्यांना भारतरत्न मिळाला ते जर गैरफायदा घेत आहेत.”
“सचिन तेंडुलकरचे चाहते खूप आहेत. त्यामुळे ते करत असलेल्या जाहीरातीचा परिणाम लहान मुलांपासून सगळ्यांवर होत आहे. त्यामुळे आमची साधी मागणी आहे की, तुम्ही जाहीरातीतून बाहेर निघावं किंवा मग भारतरत्न परत करावा. हे जर झालं नाही, तर येणाऱ्या गणेशोत्सवात आम्ही प्रत्येक गणेशमंडळात दानपेटी ठेवणार आहोत. 10 दिवस ही दानपेटी गणेशमंडळात ठेवणार. त्यानंतर त्या सर्व दानपेट्यांमधील रक्कम एकत्र करुन सचिन तेंडुलकरांना देणार” , असं बच्चू कडू म्हणाले आहेत.
ऑनलाईन गेमिंगच्या जाहीरातींमुळे भावी पिढीवर गंभीर परिणाम होत आहे. कित्येक उदाहरणं आहेत. ऑनलाईन गेमिंगमुळे आत्महत्या झाल्यात, हत्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भारतरत्न असूनही अशा गोष्टीची जाहीरात करणं हे सचिन तेंडुलकर यांना शोभत नाही, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत. आम्हाला क्रिकेटपटू म्हणून त्यांचा अभिमान आहे, पण भारतरत्न म्हणून जर ते अशा जाहीराती करत असतील तर ते मात्र मान्य नाही, असंही बच्चू कडू म्हणाले.
Discussion about this post