मुंबई । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील विरारमध्ये एक विवादित घटना समोर आली आहे, ज्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर बहुजन विकास आघाडीने पैसे वाटपाचा गंभीर आरोप केलाय. विनोद तावडे विरारमधील एका हॉटेलात 5 कोटी रुपये घेऊन आले होते. ही बाब बविआच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी हॉटेलवर धाव घेतली. यानंतर हॉटेलमध्ये बविआ आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
आज मंगळवारी विरार पूर्वेला असणाऱ्या मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये ही घटना घडली. विनोद तावडे यांच्यासोबत भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि इतर पदाधिकारी हॉटेलमध्ये बैठकीसाठी उपस्थित होते.
या प्रकरणासंदर्भात ‘बविआ’चे अध्यक्ष हिंतेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडेंवर गंभीर आरोप केले आहेत. “राष्ट्रीय सरचिटणीसांना कायदा नियम माहिती नाही का? वाड्याला गेले तिकडून 5 कोटी रुपये घेऊन इकडे आले. त्यांच्या डायऱ्या मिळाल्यात, लॅपटॉप मिळालेत. त्यात सगळे हिशोब आहे. कोणत्या लायकीचे लोक आहेत हे? हे शिक्षणमंत्री होते आपले. यांना लाज शर्म वाटते की नाही?” असा सवाल हिंतेंद्र ठाकूर यांनी विचारला आहे. तसेच पुढे बोलताना हिंतेंद्र ठाकूर यांनी, “त्यांनी मला 25 फोन केले मला. अरे बाबा मला जाऊ द्या ना! चूक झाली, असं ते म्हणाले. यांच्या चुका माफच करत बासायच्या का?” असा सवाल उपस्थित केला. “हवं तर माझं फोन बूक तुम्ही चेक करु शकता,” असंही फोन केल्याचा दावा करताना हिंतेंद्र ठाकुर यांनी म्हटलं आहे. तसेच विनोद तावडेंनी, ‘झालं ते विषय संपवा,’ असं म्हटल्याचा दावा केला आहे. “त्यांनी लोकांसमोर येऊन लोकांना आणि पत्रकारांना उत्तरं द्यावीत, विषय संपेल. मी आता इकडे आलोय. आता बघतो,” असंही हितेंद्र ठाकूर म्हणाले.
Discussion about this post