बोदवड । बोदवड-मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीतील अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर बोदवड तालुक्यातील राजूर गावात प्रचार दौर्यादरम्यान गोळीबार झाल्याची घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
विनोद सोनवणे यांनी मुक्ताईनगर-बोदवड मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसह बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील जागृती मारोती मंदीरात जावून प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरूवात केली.
प्रचार दौरा बोदवड तालुक्यात सुरू झाल्यानंतर बोदवड तालुक्यातील राजूर गावात विनोद सोनवणे यांची प्रचार रॅली सुरू असतांना कारमधून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे बोदवड तालुक्यातील एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबारमध्ये कुणालाही दुखापत झालेली नाही.