‘भारतीय गावांची गुणवत्ता पूर्ण गावांमध्ये रूपांतर’ अभियानांतर्गत दोन दिवसीय सरपंच प्रशिक्षणाचे आयोजन
जळगाव | गावाचा विकास हा केवळ आमदार किंवा खासदारांवर अवलंबून नसून तो मुख्यत्वे सरपंचांच्या मानसिकता आणि गावाच्या विकासाप्रती असलेल्या बांधिलकीवर अवलंबून असतो. सरपंच सक्षम असतील तर गावाचा सर्वांगीण विकास निश्चितपणे घडू शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले.
जळगाव जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात सोमवार, दि. 23 फेब्रुवारी रोजी Quality Council of India यांच्या वतीने आयोजित ‘सरपंच संवाद’ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल होत्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे हिमांशू पटेल तसेच इतर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या की, ग्रामसभेत गावाच्या विकासाचे योग्य नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शासनाचा संपूर्ण पाठिंबा सरपंचांच्या पाठीशी असून, सरपंच हा गावाच्या विकासाचा कणा आणि केंद्रबिंदू आहे. अशा संवाद कार्यक्रमांच्या माध्यमातून सरपंच अधिक सक्षम होतील आणि ग्रामपंचायतीच्या कामकाजात गुणवत्ता वाढेल.
ग्रामपंचायतीचा सर्व डेटा प्रत्येक सरपंचांकडे उपलब्ध असल्यास विकासकामांना गती मिळते व अडथळे निर्माण होत नाहीत, असे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी स्वतःच्या सरपंच पदापासून ते केंद्रीय मंत्रीपदापर्यंतच्या प्रवासाचा उल्लेख करत उपस्थितांना प्रेरणा दिली. दोन दिवसीय या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व सरपंचांना आमंत्रित करण्यात आले आहे. संवाद कार्यक्रमात ट्रेनर कविता वारे, सविता पांडे, विशाल चौधरी व सतीश उगले हे उपस्थित सरपंच व विस्तार अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत.















Discussion about this post