जळगाव । विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संलग्नित महाविद्यालयांमधील पदवीच्या विद्यार्थ्यांवर अवलंबून न राहता विद्यापीठांनी कॅम्पसमध्ये पदवी अभ्यासक्रम सुरु करावेत असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात रविवार दि.८ ऑक्टोबर रोजी सेमीकंडक्टर वेफर प्रक्रियेसाठी धूलिकण विरहित प्रणालीयुक्त प्रयोगशाळेचे उद्घाटन विकासचंद्र रस्तोगी यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी होते. विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेचे अध्यक्ष व जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्राचार्य डॉ.के.बी.पाटील हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे यांची देखील उपस्थिती होती. याच समारंभात कौशल्य विकास केंद्राच्या माहितीपत्रकाचे विमोचन आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन (ऑनलाईन) केंद्राचे उदघाटन देखील झाले.
रस्तोगी म्हणाले की, देशात रिसोर्सेस मुबलक नाही त्यामुळे योग्य पध्दतीने नियोजन करण्याची गरज आहे. आपल्या देशात विद्यापीठाकडे उपलब्ध असलेल्या जागांच्या तुलनेत विद्यार्थी संख्या कमी आहे. ही संख्या वाढवावी लागणार आहे. विद्यापीठ आणि प्राधिकरणांचा बहुतांश वेळ हा परीक्षा, संलग्नता आदी मध्ये जातो. विद्यापीठांना पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संलग्नित महाविद्यालयांमधील पदवीच्या विद्यार्थ्यांची वाट बघावी लागते. सद्या पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थी संख्या कमी होत आहे. त्याकडे गांभिर्याने बघण्याची गरज आहे. त्यासाठी विद्यापीठांनी पदवी अभ्यासक्रम सुरु करावेत अशी सूचना त्यांनी केली. व्यवस्थापन परिषद, अधिसभा आणि विद्यापरिषदेच्या सदस्यांनी देखील आपले स्वारस्य न जोपासता अनुभवाचा फायदा उच्च शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी करण्याची गरज आहे. उच्च शिक्षणातील गुणवत्तेसाठी कोणत्याही प्रकारची तडजोड करता कामा नये. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यात देशात महाराष्ट्राचे काम खुप उत्तम आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री हे स्वत: गुणवत्ता व उत्कृष्टतेचा आग्रह धरणारे आहेत. असे सांगून रस्तोगी यांनी भविष्यात स्वायत्त महाविद्यालयांना पदवी प्रदान करणाऱ्या विद्यापीठाचा दर्जा देण्याचा विचार सुरु असल्याचे सांगितले.
माजी कुलगुरू डॉ. के.बी. पाटील यांनी आरोग्य आणि शिक्षण यामधील शासनाला जबाबदारी झटकून चालणार नाही असे मत व्यक्त केले. अशोक जैन यांनी या विद्यापीठाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. राजेंद्र नन्नवरे यांनी हे विद्यापीठ ग्रामीण व आदिवासी भागात असून मर्यादित संसाधनात चांगले काम करीत असून शासनाने विद्यापीठाला सहकार्य करावे असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. माहेश्वरी
यांनी विद्यापीठाच्या वाटचालीची व उपक्रमांची माहिती दिली. प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांनी प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पुरूषोत्तम पाटील यांनी केले.
Discussion about this post